‘आडवं येणार्‍यांना आडवं करू म्हणणार्‍या’ मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आडवे करू, तिडवे करू, शेण, गोमुत्र अशा प्रकारचे शब्द मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या माणसाच्या तोंडी बरोबर नाहीत. त्यांना अशीच भाषा वापरायची असेल, तर सर्वसामान्य माणसांनाही हे कळतय की जे काही सुरू आहे ते योग्य नाही. जर त्यांना कोणाला आडव-तिडव करायचे असेल, तर ते बोलण्यात वेळ का घालवत आहेत? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे मला वाटते त्यांना जे काही वाटतय ते त्यांनी एकदा करूनच टाकावे, असे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP unit president Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेची लवकरच वर्षपूर्ती होत आहे. या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाजोपयोगी कामाबाबत त्यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये, कोणी कितीही आडवे आले तरी आडव येणाऱ्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल, असे विधान मुख्यमंत्री ठाकरे करताना दिसत आहेत. याच वक्तव्याचा समाचार घेत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. प्रियम गांधी-मोदी यांच्या पॉवर ट्रेडिंग या पुस्तकात शरद पवार यांनी आयत्या वेळी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीची सत्ता आणण्यास मदत केली असा दावा केला आहे. त्यावर आपले मत काय असे विचारले असता, यासंदर्भात मला काही माहिती नाही. त्याबद्दल लेखिकांना विचारा, असे पाटील म्हणाले.