Pune : ग्रामसुरक्षेचा योग्य विनियोग करून 29 लाखांचा दरोडा आणला उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २९ लाख रुपयांचा झालेला सिन्टेस्टाईल दरोडा दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर उघडकीस आणला आहे. २९ ऑगस्टला महामार्गावर रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकांकडून दुचाकी गाड्यावर आलेल्या चोरट्यांनी २९ लाख रुपये लांबवले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून एकाच नंबरच्या दोन पल्सर तर नंबर नसलेली एक दुचाकी जप्त केली आहे.

मिळलेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीत पुण्यातून सोलापूरकडे पोल्ट्रीचे खाद्य घेण्यासाठी निघालेला टेम्पो चालक लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूस थांबला होता. त्यावेळी हत्यारबंद चोरट्यांनी दुचाकी गाड्यावर येऊन चालकाजवळ असलेली २९ लाखांची रोकड लुटून पळ काढला होता. ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळताच त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेस चोरीचा संदेश दिला. हा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच वेळी साठ हजार लोकांपर्यंत पोहचला आणि त्याचवेळी पाटस टोल नाक्याकडून बारामती मार्गाकडे जाणाऱ्या एका नागरिकानी हा संदेश ऐकला.

त्याचवेळी त्याच वर्णनाची मोटारसायकल दिसल्याने तिचा पाठलाग केला असता, अंधाराचा फायदा घेऊन चोरांनी मोटारसायकल तिथेच सोडून शेजारच्या शेतात पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी पाहणी केली असता त्याठिकाणी ८ लाख २८ हजार इतकी रक्कम बॅगेत आढळून आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अधिक तपास केला असता पाटस पोलिसांना एक आणि नंतर चार आरोपींना पकडण्यात यश आलं. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे आरोपी पकडण्यास व ही घटना उघडकीस येण्याचे पुणे जिल्ह्यातील पहिला प्रयत्न आणि तो यशस्वी झाल्याने दौंड पोलिसांना यश आलं आहे.