पुर्वी लोक सायकल, गाडी भाड्याने घेत होते ; शरद पवारांनी इंजिनच भाड्याने घेतले : देवेंद्र फडणवीस

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, गाडी भाड्याने घेत होते, मात्र शरद पवारांनी या निवडणुकीत इंजिन भाड्याने घेतले आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सासवड येथील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी, या निवडणूकीत बारामतीकरांनी बारामतीत ३२ किलोमीटर परिसरात २ दिवसात ७ सभा घेतल्या. त्या कमी पडल्या की काय म्हणून आता साहेबांनी रेल्वेचे इंजिन भाड्याने घेतले आहे. असे त्यांनी म्हंटले. तसेच ‘पूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, गाडी भाड्याने घेत होते, या निवडणुकीत मात्र शरद पवारांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, ते ही असे इंजिन भाड्याने घेतले जे म्युझियममधील कोळशाचे इंजिन आहे. अशाने त्यांची बारामतीची गाडी पुढे सरकणार नाही. अशी टीकाही त्यांनी केली.

याचबरोबर, पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. आपल्या देशाची मोठी हानी झाली. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. त्यावेळी बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ लष्कराने पहाटे हल्ला करून उद्ध्वस्त केली. असेही त्यांनी म्हंटले.