CM देवेंद्र फडणवीसांचा ‘B’ प्लॅन रेडी ! शिवसेनेच्या दिग्गजांसह 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आज सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, या भेटी दिवाळीनिमित्त घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सत्ता स्थापनेच्या धामधुमीत युतीत असलेली शिवसेना 50-50 च्या फार्म्युल्यावर आडून बसली आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन बी तयार असून, शिवसेनेच्या दिग्गजांसह तब्बल 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा तब्बल 161 जागांवर विजय झाला आहे. त्यामध्ये भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार विजयी झाले आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे शिवसेने शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शिवसेनेकडून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी देखील करण्यात आली आहे. अन्यथा, पर्यायी मार्ग शिवसेनेकडे असल्याचा इशारा देखील संबंधितांकडून देण्यात आला आहे. शिवसेनेने महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा प्लॅन बी तयार करून ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सेनेकडून 3-4 वेळा निवडून आल्यानंतर देखील मंत्रिपद पदरात न पडलेल्या आमदारांचा एक गट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, याला अद्याप अधिकारिकदृष्टया दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, निवडणुकीपुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी शिवसेनेमधील एक गट मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज असल्याचं बोललं जातं होतं. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून जास्तच दबाव भाजपावर आला तर नाराज असलेल्या आमदारांचा एक गट बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊ शकतो. मात्र, ही केवळ शक्यता आहे.