अशोकरावांकडे पक्षाचे काम उरलेले नाही ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २८ फेब्रुवारीला विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जातील, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला आहे. अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. त्यांच्याकडे सध्या पक्षाचे काम उरलेले नाही’, असा टोमण मुख्यमंत्र्यांनी मारला आहे.

अशोक चव्हाण यांना हल्ली भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. पक्षात त्यांची कामे संपलेली आहेत किंवा त्यांना काही कामे उरलेले नाही. त्यामुळे असे भाकित ते वर्तवत आहेत. अशोकरावांनी विरोधी पक्षात बसण्याची घाई करु नये. आम्ही योग्य वेळीच निवडणूक घेऊ, असं त्यांनी म्हटलं. तसंच विधानसभा निवडणूक आधी घेण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसंच फडणवीस यांनी पालघरबाबतही आपली प्रतिक्रिया दिली. पालघर जिल्ह्यात दोन महिन्यापासून भूकंपाचे झटके येत आहेत. पालघरमधील भूकंपग्रस्त भागात चार यंत्रे बसवण्यात आली असून आम्ही यासंदर्भात मुंबई आयआयटीशी मदत घेत आहोत. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही या भागात तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.