धक्कादायक ! विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून SIT तपासाचे आदेश

उज्जैन : वृत्त संस्था – विषारी दारूमुळे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतांच्या शरीरात विषारी घटक सापडल्याची माहिती उज्जैनच्या एसपींनी दिली. घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपा सरकारवर टीका
घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यात अशा घटना टाळण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. ज्या ठिकाणी अशाप्रकारची विषारी दारू तयार केली जात असेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. विरोधकांनी या घटनेनंतर सत्ताधार्‍यांना घेरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

विषारी दारू बनवणारे प्रमुख 3 जण ताब्यात
या प्रकरणाची माहिती देताना उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रुपेश द्विवेदी म्हणाले की, बुधवार ते गुरुवारपर्यंत उज्जैनच्या खाराकुआ, जीवजीगंज ठाणे आणि महाकाल ठाण्याच्या हद्दीत विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गरीब लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी छापेमारी करून 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. जिंजर तयार करणारे सिंकदर, गबरु आणि युनूस हे बेकायदेशीरपणे जिंजर म्हणजेच विषारी दारू करून तिचा पुरवठ करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.