महामंडळाबाबत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकामागून एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता ठाकरे सरकारने आपला मोर्चा महामंडळ आणि मंडळांकडे वळवला आहे. राज्यातील महामंडळावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नियुक्त्या ठाकरे सरकार रद्द करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. काही महामंडळांच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्याने सत्ताधाऱ्यांकडून त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत 29 महामंडळे तर 7 मंडळे आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील नेत्यांची नेमणूक महामंडळावर केली. मात्र, आता सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडी या महामंडळांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावणार आहे. त्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

राज्य सरकारच्या अधिपत्याखालील महामंडळांवर नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. त्यामुळे या महामंडळ आणि मंडळावर सत्तेतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली असल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/