…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रविवारचा रायगड दौरा झाला रद्द

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर ते आज जाणार होते. त्यांच्या हस्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत साहित्याचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एक दिवसाच्या रायगड दौर्‍यावर जाणार होते. मात्र, अचानक हा नियोजित दौरा सायंकाळी रद्द करण्यात आला. रविवारी चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होते. त्याचबरोबर चौल येथे जाऊन आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्याचेही मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात नियोजित होते.

11 वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदिल, इतर साहित्याचे वाटप करण्यात होते. त्यानंतर बोर्ली आणि मुरुड येथे नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्याचे नियोजित होते. रायगड आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे निसर्ग चक्रीवादळ निर्माण झाले होते.

चक्रीवादळाचा रायगड, रत्नागिरीसह सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही भागाला मोठा फटका बसला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. तसेच मदत निधीही जाहीर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा कोकणातील सलग दुसरा दौरा होता.