विधान परिषद : भाजप, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप (complaint against candidate of BJP, mahavika aghadi and MNS of Pune graduate constituency) करत पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

राज्यात पुणे पदवीधर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपल्या उमेवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, पुणे पदवीधर मतदरसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरताना माहितीपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे.