सांगलीत दोन सावकारांवर गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली जिल्ह्यात दमदाटी करून पैसे वसूल करणा-या खासगी सावकारांनी दहशत निर्माण केली आहे. या सावकारांविरूद्ध सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोहिम उघडली असून या मोहमेचा पहिला दणका दोन सावकारांना बसला आहे. या सावकाराविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (दोघेही रा. विश्रामबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नील प्रकाश गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी) याने फिर्याद दिली आहे. गळतगे यांचा प्लास्टीक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने गळतगे याने सांगलीतील एका बँकेत कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी बँकेतील एका कर्मचाऱ्याने विशाल कुडचे यांच्याकडून प्रतिमहिना सात टक्के व्याजाने तातडीने पैस मिळतील असे सांगितले. गळतगे याला पैशांची गरज असल्याने त्याने कुडचे याच्याकडून ४ लाख रूपये घेतले. त्यावेळी कुडचेने त्याच्याकडून दोन कोरे धनादेश, शंभर रूपयांचा एक मुद्रांक सही करून घेतला. तसेच चार महिन्यांचे व्याज एक लाख आठ हजार रूपये कापून घेतले. व्याज कापून राहिलेली रक्कम गळतगे याच्या बँक खात्यावर भरली. त्यावेळी दर आठवड्याला वीस हजारांचा हप्ता देण्याची अट कुडचे याने घातली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गळतगे याने त्याला ४ लाख ३८ हजारांची रक्कम दिली होती. तरीही अजून ३ लाख ९५ हजार रूपयांची बाकी असल्याचे सांगत कुडचे गळतगेसह त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर गणेश वायदंडे आणि कुडचे याने गळतगे कुटुंबियांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळतगे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याशिवाय पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडेही तक्रार दिली होती. त्याची दखल घेत कुडचे व वायदंडे यांच्याविरोधात खासगी सावकारी अधिनियम १९४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेंतर्गत पहिली कारवाई झाल्याने आता जिल्ह्यातही सावकारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्याचे संकेत यातून शर्मा यांनी दिले आहेत.

जाहिरात