काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांमध्ये या ना त्या कारणामुळे वाद झाल्याचे समोर आले आहेत. आता त्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसचे नाराज आमदारांनी उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केला. अजित पवारांच्या फोन नंतर आमदरांनी उपोषण रद्द केले. त्यानंतर आता काँग्रेसचे नाराज आमदार कैलास गोरंट्याल अजित पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.

काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आज कैलास गोरंट्याल हे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांनी आपल्या दालनात कैलास गोरंट्याल यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यांनी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला. नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घातली असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. गेल्या 8 महिन्यापासून नगरविकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचेही पैसे दिले नाहीत, असे गोरंट्याल यांनी म्हटले होते.