माढ्यात भाजपची ताकद वाढली, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे काँग्रेसला धक्कातंत्र सुरूच आहे. काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्याणराव काळेसोबतच माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, सुरेखा पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने माढ्यात भाजपची ताकद वाढली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजय शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्यामुळे शिंदे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. कल्याणराव काळेंनी माढ्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ६५ हजार मते घेतली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील मोठी अडचणीत भर पडली आहे.

कल्याणराव काळे हे पंढरपूरचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याविरुद्ध ६५ हजार मते घेत त्यांना अडचणीत आणले होते. आता काळे भाजपमध्ये गेल्याने संजय शिंदेंसमोरच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. काल काँग्रेसचे माण खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांनीही माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता.