…अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  – काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज आपल्या  विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्याचे म्हटले आहे. विखे पाटील यांनी आज शिर्डी यथे कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावली होती.

विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारीही मिळविली. आता राधाकृष्ण विखे देखील भाजपत प्रवेश करणार याची चर्चा होती. तसेच अनेक कारणांवरुन काँग्रेसच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या  प्रचाराकरिता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र ही सभा शिर्डी येथे होणार नसून या सभेचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले आहे. त्यावरून देखील विखेंचा पत्ता काँग्रेसमधून कट झाल्याची चर्चा होती.  आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे.

अशोक चव्हाणांचा भरसभेत विखेंबाबत इशारा
पक्षविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आता विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत  देखील लवकरच निर्णय होईल असा इशारा काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना येथील सभेत बोलताना दिला होता, जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२०) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत संकेत दिले होते.

ससाणे यांचा राजीनामा
बुधवारी शिर्डीमध्ये जयंत ससाणे यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीनंतर ससाणे यांनी आपल्‍या अध्यपदाचा राजीनामा दिला. या बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुरुवारी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. ‘‘आपण निर्णायक वळणावर आलो असून, जो काही निर्णय होईल, त्यात आपण सर्वांनी बरोबर रहावे”, असे अवाहनही विखे-पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.