‘भाजपनं त्यांच्या 105 आमदारांवर लक्ष ठेवावं, अनेक जण आमच्या संपर्कात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा दावा देखील त्यांनी केला आहे. महाराष्ट्राने नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल असेही त्या म्हणाल्या.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं, की ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल असे म्हटले होते. त्यावर बोलताना भाजपनं त्यांच्या 105 आमदारांवर निट लक्ष ठेवावं, असं सूचक विधान ठाकूर यांनी केलं. त्या एका न्यूज चॅनलशी बोलत होत्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पक्ष तीन असले तरी त्यांचा उद्देश एकच असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.