महाराष्ट्रातही राष्ट्रवादी – कॉंग्रेसला कौल मिळेल

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – देशात एक प्रगतीशील शहर म्हणून बारामतीची ओळख निर्माण झाली. त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्याचा विकास करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली. लोकशाहीला कीड लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीच्या वतीने सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, आशिष दामले, सुभाष पिसाळ, महेश तपासे, अ‍ॅड. प्रमोद चौधरी, कालिदास देशमुख, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे, चेतनसिंह पवार आदी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. त्यात मुरबाडच्या विकासालाही फटका बसला. तालुक्यात रोजगार मिळवून देणारी एमआयडीसी भकास झाली आहे. राज्य सरकारने चार वर्षात एमआयडीसीकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड एमआयडीसीला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, ही रक्कम कमी असूनही घोषणा पूर्ण केली जाणार नाही. केवळ राज्य सरकारकडून फसवणूक केली जात आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. मुरबाड एमआयडीसीला दिलेला निधी हा इलेक्शन स्टंट आहे, अशी टीका पवार यांनी केली.

राज्य सरकारकडून लोकशाहीला कीड लावण्याचे काम केले जात आहे. राज्याचा विकास ठप्प झाला. यशवंतराव चव्हाणांपासून मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी चांगले कार्य केले. मात्र, आता राज्याला फटका बसला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. समृद्धीत उखळ पांढरे ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात अनेक जणांनी आपले उखळ पांढरे केले आहे. शेतकऱ्यांकडील जमिनी नगण्य किंमतीत घेऊन पाच पटीने विक्री करण्यात आली, असा आरोप अजित पवार यांनी केला.

राज्यात कौल वेगळा मिळेल देशात झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थानबरोबरच अनेक राज्यातील मतदारांनी केंद्र व राज्यात वेगवेगळे मतदान केले. त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसला कौल मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

मुरबाडची काही वर्षांत पिछेहाट झाली. मुंबईजवळ असूनही मुरबाडचा विकास झालेला नाही. राज्यातील आदर्श शहरांमध्ये मुरबाडची गणना होण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. बारामतीप्रमाणे मुरबाडचा विकास होण्याची गरज आहे. त्याचबरोबर तालुक्यातील बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी विविध उद्योग सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांनी केली.

Visit : policenama.com