भारताची लोकशाही आतापर्यंतच्या सर्वात कठीण काळातून जातेय, सोनिया गांधींचा थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतातील लोकशाही ही आत्तापर्यंतच्या सर्वात कठिण काळातून जात असून तिला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सरकारने केलेले कृषी कायदे हे काळे कायदे आहेत, असे गंभीर आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. रविवारी पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला. तीन कृषी कायदे, कोरोनाचे महासंकट, अर्थव्यवस्थेची घसरण आणि दलितांवर होत असलेल्या अत्याचारावरून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

अर्थव्यवस्था रसातळाला गेली
काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस आणि राज्यप्रभारी यांच्याशी रविवारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, केंद्र सरकार देशातल्या नागरीकांचे अधिकार हे फक्त काही मुठभर उद्योगपतींना सोपवू इच्छित आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती, नेतृत्व, नीती, नियत आणि योग्य दिशेचा अभाव आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. यापूर्वी असे झाले नव्हते. केंद्र सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांविरुद्ध काँग्रेस लढणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

काँग्रेस पक्षात नव्याने करण्यात आलेल्या काही नियुक्त्या आणि फेरनियुक्त्यांनंतर सोनिया गांधी यांनी प्रथमच नवनियुक्त पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षांतर्गत मोठे फेरबदल झाले होते. तत्पूर्वी अध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी यासाठी काही नेत्यांनी सोनिया गांधी ना पत्र लिहिले होते. या पत्रावर सह्या करणार्‍या अनेक नेत्यांना डावलून नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली. पत्र लिहिलणार्‍या या नेत्यांवर राहुल गांधी सुद्धा नाराज झाले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत नाट्य सुरू होते. या दरम्यान, काही नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे. अशी देखील मागणी केली होती.