राहुल गांधींकडे अध्यक्ष होण्याची क्षमता, शशी थरुर यांनी मांडले मत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेस पक्ष दिशाहीन असल्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला पक्षाने वेग देण्याची गरज असल्याचे शशी थरुर यांनी म्हटले आहे. पक्षाचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे क्षमता आणि योग्यता आहे. मात्र जर त्यांना अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची गरज आहे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थरुर यांनी राहुल गांधींच्या कामाचे कौतुकही केले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चुकीचे निर्णयासह करोना स्थिती हाताळण्यावरुन जबाबदार धरत धारेवर धरले आहे. दरम्यान, लोकांचा काँग्रेस पक्षाबद्दल असलेला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. काही प्रसारमाध्यमांमुळे काँग्रेस पक्ष दिशाहीन असल्याचा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. सोबतच विरोधी पक्ष म्हणून आव्हान स्वीकारण्यास असमर्थ असल्याचंही लोकांना वाटू लागले आहे.

सर्वात जुना पक्षा असणार्‍या काँग्रेसकडे स्पष्ट नेतृत्त्व असले पाहिजे असेही शशी थरुर यांनी सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती.