शिवसेना अन् काँग्रेसमध्ये जुंपली ! चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसेनेच्या ‘बड्या’ मंत्र्यानं फटकारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरु आहे. त्यातच आता सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वेग वेगळ्या चर्चांना तोंड फुटल्याचे पहायला मिळत आहे.

सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलत असताना थेट शिवसेनेलाच इशारा दिला. शिवसेनेसोबत सरकारमध्ये येताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आम्हाला अतिशय कडक आदेश दिले. घटनाबाह्य काम करणार नाही असे शिवसेनेकडून लिहून घ्या असे आम्हाला बजावले होते. आणि आम्ही ते उद्धव ठाकरेंना सांगितले, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली होती.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचे म्हणणं फेटाळून लावलं आहे. शिवसेनेने काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असे शिंदे म्हणाले. सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण यांनी कोणत्या संदर्भात हे विधान केले ते माहित नासल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.