‘कोरोना’ची लस मिळणार केवळ 225 रूपयांमध्ये, पुण्यातील सीरम इन्स्टिटयुटनं केलं जाहीर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विरुद्धची लस लवकरात लवकर तयार व्हावी आणि ती नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरुच आहे. मात्र, कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्त देखील असावी यासाठी भारत प्रयत्नशिल आहे. फक्त भारतातच नाही तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे. आणि त्या दिशेने आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आलं आहे. सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजेच फक्त 225 रुपये असेल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सरु आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत.

सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे. या लसींचं ट्रायल यशस्वी झालं. त्याला परवानगी मिळाली. तर सीरम इन्स्टिट्युट या लशीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स फाऊंडेशनकडून ‘गावी’ला 1125 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीतून गावीकडून सिरमला लस उत्पादनासाठी सहकार्य केले जाईल. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना केवळ 225 रुपयांत मिळू शकले. भारतासह जगभरातील 92 गरीब देशातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी असलेल्या सिरमला या सहकार्यामुळे लसींची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होणार आहे. या देशांना 2021 च्या सुरुवातीलाच 10 कोटी डोस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सिरमवर असेल. तसेच गरज भासल्यास आणखी लशींचा पुरवठा केला जाणार आहे.