कोरोनाचे थैमान, मुंबईत दिवसभरात 10 जणांचा मृत्यू, रुग्णांचा आकडा एक हजारावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रातही सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. मुंबईत आज कोरोनाबाधित रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा समोर आला आहे. आज एका दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे झालेल्या चार जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील संक्रमितांचा आकडा 1008 झाला आहे तर आतापर्यंत 64 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

दरम्यान, राज्यात 16 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 1 हजार 380 वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 574 वर पोहोचली आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जंतुकीरणासाठी ड्रोनचा वापर

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासंबंधित सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय करण्यात आल्याचे समजते. यावेळी माहिती देताना आरोग्यंमत्री राजेश टोपे म्हणाले, आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेची बाब असून याबाबत मुंबईच्या लोकप्रतिधीनी त्यांची निरीक्षणे मांडली. यात गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे देखील मांडले गेले.

दाटीवाटीच्या परिसरात लॉकडाऊन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. यासोबतच गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे. रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ,ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.