मुंबई पोलीस दलातीत 2 पोलिसांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, मृतांची संख्या 10

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 57 वर्षीय पोलीस हवालदार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे वास्तव्यास होते. तसेच मागील आठ दिवसांपासून सेव्हल हिल्स रुग्णालयात ते उपचार घेत होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि.20) त्यांचा मृत्यू झाला. पार्क साईट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना पवार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वाहतूक विभागातील पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 10 वर पोहचला आहे.

पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अलीकडेच मुंबई पोलीस दलातील एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मागच्या शनिवारी पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचे वय केवळ 32 वर्षे होते.

या अधिकाऱ्याला ताप आणि सर्दी असल्याने काही दिवसांपासून आजारी रजा काढून ते घरी आराम करत होते. त्यांनी 13 मे रोजी सायन रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्याचा अहवाल मिळाला नसला तरी कोरोना झाल्याच्या शक्यतेमुळे ते चिंतेत आणि अस्वस्थ होते. पहाटे पाचच्या सुमारास घरातील मंडळींना ते बाथरुममध्ये बेशुद्धअवस्थेत आढळून आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले होते.