…म्हणून सुधीर मुनगंटीवार झाले ‘ट्रोल’, त्यानंतर वैतागून Video हटवला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल जनतेशी संवाद साधला. मात्र फेसबुक लाइव्हदरम्यान अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी फेसबुक लाइव्ह अर्ध्यावरच सोडून काढता पाय घेतला. त्यानंतर स्वत:च्या पेजवरील हा रेकॉर्डेड व्हिडिओही त्यांनी डिलीट केला. यापुर्वी विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम कदम, रावसाहेब दानवे यांनाही त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

‘आपुलकीचा संवाद’ या नावाने मुनगंटीवार यांनी जनतेशी संवाद साधला. पाच वाजता त्यांच्या पेजवरुन फेसबुक लाइव्ह सुरु झाल्यानंतर कमेंटमध्ये इमोन्जी, स्मायली आणि कमेंटचा पाऊस पडू लागला. मुनगंटीवार काय बोलत आहेत याऐवजी ट्रोलर्सने आणि टीकाकारांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान कमेंट करून त्यांना वेगवेगळ्या विषयांवर जाब विचारण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री मदतनिधीऐवजी पीएम केअर्ससाठी मदत करण्यास का सांगितले जात आहे?, हा प्रश्न अनेकांनी विचारला.

तसेच अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत मुनगंटीवार यांना थेट लाइव्हदरम्यान कमेंटमधून प्रश्न विचारले. अनेकांनी खास ग्रामीण भाषेमध्ये मुनगंटीवार आणि भाजपाच्या भूमिकेवर टीका केली. ट्रोलर्स आणि टीकाकर कमेंटच्या माध्यमातून टीका करत असतानाच दुसरीकडे मुनगंटीवार यांनी आपला संवाद सुरुच ठेवला होता. मात्र टीका करणार्‍या आणि केवळ स्मायली असणार्‍या कमेंट दीड हजारांहून अधिक झाल्या. त्यानंतर मात्र मुनगंटीवार यांनी संवाद थांबवण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने मुनगंटीवार यांच्या फेसबुक पेजवरील लाइव्हचा हा रेकॉर्डेड व्हिडिओही डिलीट करण्यात आला.