Coronavirus : मुंबईतील झोपडपट्टीमध्ये पसरतोय ‘कोरोना’, 4 जणांना ‘लागण’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना वेगोन पसरत असून मुंबईमधील कोरोनाबाधितांमध्ये संख्या वाढत आहे. गुरुवारी त्यामध्ये 15 जणांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या 77 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार रुग्ण हे शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील आहेत. त्यामुळेच आता करोना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये हातपाय पसरले आहे. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये विलगीकरणामध्ये राहणे, सोशल डिस्टन्सींग ठेवणे शक्य होणार नसल्याने झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये दोन रुग्ण अढळून आले आहेत. तर इतर दोन रुग्णांपैकी एक रुग्ण कलिना येथील तर दुसरा परळमधील चाळीत अढळून आला आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या घरकाम करणार्‍या 68 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. ही महिला काम करत असणार्‍या घरातील व्यक्ती परदेशातून आलेली होती. त्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे त्याचा संसर्ग या महिलेला झाल्याचे सांगितले जात आहे.

घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या 25 वर्षीय तरुणाचा करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्याने या तरुणाला रोगाची लागण झाल्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्या चाचण्या निगेटीव्ह आल्याने अधिकार्‍यांचा जीव भांड्यात पडला आहे. या महिलेच्या कुटुंबियांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने विलगीकरणामध्ये ठेवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे घर झोपडपट्टीमध्ये अगदी आजूबाजूच्या घरांना लागून असल्याने तिथे तिच्या कुटुंबियांना विलगीकरणामध्ये ठेवणं शक्य नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कुटुंब पुढील चौदा दिवस पालिका अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली असणार आहे.