धक्कादायक ! डॉक्टरच्या चुकीमुळं ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू, रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी दाखल केला FIR

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचे थैमान वेगाने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खाजगी डॉक्टरच्या चुकीमुळे एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या या रुग्णाचा 6 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाची दखल जिल्हाधिकार्‍यांनी खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरविरूद्ध दाखल करण्याचे आदेश दिले. डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाचा प्रसार आणखी वाढत असल्याच्याही घटना घडत आहेत. अशातच रत्नागिरीमध्ये एका डॉक्टरच्या चुकीमुळे एका कोरोनाग्रस्त रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी तातडीने घटनेची दखल घेत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर फक्त सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. राज्य सरकारने खाजगी डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवण्याचे आवाहन करताना सर्दी खोकला वा करोनासदृश्य लक्षणे असलेले रुग्ण आले तर त्यांना कोणताही विलंब न लावता सरकारी दवाखान्यात पाठवण्यात यावे, अशी सूचना दिलेल्या आहेत.

दरम्यान, खाजगी डॉक्टरकडे कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण उपचारासाठी गेला होता. त्या रुग्णाला सरकारी रुग्णालयात न पाठवता डॉक्टरने उपचार केले. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने या रुग्णाला 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हा रुग्ण 18 मार्च रोजी दुबईहून घरी आला होता. त्याच्या एका आठवड्यानंतर त्याला करोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर तो खाजगी रुग्णालयात गेला होतो, अशी माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.