Coronavirus : दिलासादायक ! ऑक्टोबरमध्ये घटतेय बाधितांची संख्या, 56 दिवसांनंतर नव्या रुग्णांची संख्या आली 55 हजारांवर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनातून मुक्तीच्या दिशेनं जात असताना आता ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. 24 तासातील नवीन रुग्ण वाढण्याचा वेग मंदावला आहे. तब्बल 56 दिवसांनी नवीन रुग्णांची संख्या पुन्हा 55 हजार एवढी खाली आली आहे.

18 ऑगस्ट रोजी 55,079 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 24 तासात नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण 90 हजारांच्या पुढं गेलं होतं. आता हे प्रमाण 55,342 वर आलं आहे. रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण 9 ते 15 सप्टेंबर या काळात 8.50 टक्के होतं. ते 7 ते 13 ऑक्टोबरमध्ये 6.24 टक्क्यांवर आलं आहे. सध्या 8,38,729 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 5 आठवड्यांपासून भारतात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या ही 90 हजारांवर गेली होती. या 15 ते 20 दिवसांच्या काळात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास अर्ध्यावर आली आहे.

1.5 टक्के रुग्णांना कोणताही आजार नव्हता
एकूण 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या 45 ते 60 वयोगटातील 13.9 टक्के रुग्णांना अन्य आजार होते. तर 1.5 टक्के रुग्णांना कोणताही आजार नव्हता.