Coronavirus : देशात ‘कोरोना’नं मोडलं रेकॉर्ड ! 24 तासात 16922 नवे पॉझिटिव्ह तर 418 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार देशात एकूण रूग्णांची संख्या 4 लाख 73 हजार 105 झाली आहे. यापैकी 14894 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाख 71 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख 86 हजारांहून अधिक आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16 हजार 922 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 418 लोकांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 75 लाख 60 हजार 782 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 7 हजार 871 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची 1 लाख 42 हजार 900 प्रकरणांची नोंद झाली असून त्यामध्ये 6739 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 73 हजार पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सक्रिय प्रकरणांची संख्या 62 हजारांपेक्षा जास्त आहे. दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 70 हजाराहून अधिक आहे, ज्यामध्ये 2365 लोक मरण पावले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्या 26 हजारांपेक्षा जास्त आहे.

त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये एकूण कोरोनाचे रुग्ण 67 हजाराहून अधिक आहेत, ज्यामध्ये 866 लोक मरण पावले आहेत, तर 37 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या 28 हजारांपेक्षा जास्त आहे. गुजरातमधील रूग्णांची एकूण संख्या जवळपास 29 हजार आहे, ज्यामध्ये 1735 लोक मरण पावले आहेत. गुजरातमध्ये केवळ 6120 सक्रिय प्रकरणे आहेत.