Coronavirus : लॉकडाऊन 5.0 ची पुणे महापालिकेची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय चालू अन् काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण देशात लॉकडाऊन 5.0 सुरू आहे. 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 लागू राहणार आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य शासनानं त्यांची नियमावली यापुर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान, आज (मंगळवार) पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेची लॉकडाऊन संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोनमध्ये राहणार्‍यांना कुठलीही सुट किंवा शिथीलता देण्यात आलेली नाही. त्यांच्यासाठी पुर्वीसारखचं लॉकडाऊन असणार आहे.

कंटेन्मेंट झोन बाहेर काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे –
1. प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone
1. संबंधित पोलीस स्टेशन प्रमुख सोबतच्या अनुसूची -1 मधील क्षेत्राच्या हद्दीत प्रतिबंधित (सील) करतील.
2. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीमध्ये वैद्यकीय/आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी, या सेवा वगळता/पुरवठा वगळता अन्य व्यक्ती यांना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे.
3. अ) प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा जसे स्वयंपाकाचा गॅस, इ. जीवनावश्यक वस्तू, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालय, व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना यामधून वगळ्यात येत आहे.
ब) मनपाची अत्यावश्यक सेवा देणारी सर्व प्रकारची वाहने जसे पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी व त्यावरील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी यांना प्रतिबंधात क्षेत्रामध्ये केव्हाही प्रवेश करता येईल. त्या करिता कोणत्याही पासची आवश्यकता राहणार नाही.
4. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री, सेवा करण्याकरिता खालील कार्यपद्धती असेल.
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला विक्री, औषध विक्री, दवाखाने, दुध विक्री, रेशन दुकाने इ.) सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहतील.

2. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (Outside Containment Zone) शिथिलीकरणाचा पहिला टप्पा – 3 जून पासून खालील बाबी अटींसह सुरू होईल
1. घराबाहेरील व्यायाम – वैयक्तिक व्यायाम जसे सायकलींग, जॉगिंग, धावणे, चालणे याबाबी सार्वजनिक मोकळ्या जागा जसे खासगी, सार्वजनिक मैदाने, पुणे महापालिकेची मैदाने व उद्याने, संस्था, सोसायटीची मैदाने, उद्यान या ठिकाणी खालील अटींच्या अधीन राहून करात येतील. मात्र, कोणत्याही क्रिया क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात केली जाणार नाही.
– वरील नमूद सुविधा पहाटे 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत वापरता येतील.
– वरील नमूद क्रिया या सामुदायिक स्वरुपात करता येणार नाहीत. तथापि मुलांच्या सोबत मोठी व्यक्ती असणे आवश्यक राहील.
– नागरिकांनी केवळ शारीरिक व्यायाम करण्याकरिता थोड्या वेळा करिताच घराच्या बाहेर जावे.
– वरील नमूद वैयक्तिक व्यायाम करण्या शिवाय अन्य कोणत्याही बाबी यांना परवानगी नसेल.
– नागरिकांनी केवळ आपल्या घराजवळील वरील नमूद मोकळ्या जागांचा वापर करावा. दूरच्या ठिकाणी वैयक्तिक व्यायाम करण्यासाठी त्यांना प्रवास करता येणार नाही.
– नागरिकांनी मोकळ्या मैदानात गर्दी करू नये असा त्यांना सल्ला देण्यात येत आहे. नागरिकांनी व्यायामाकरिता सायकलचा वापर करावा जेणे करून त्यांच्यात आपोआप सामाजिक सुरक्षित अंतर राहू शकेल.
2. स्वयं रोजगार करणाऱ्या व्यक्ती जसे प्लंबर, विद्युत विषयक काम करणारे, पेस्ट कंट्रोल आणि अन्य तांत्रिक स्वरुपाचे व्यवसाय करणारे व्यक्ती सामाजिक सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर करून काम करू शकतात.
3. नागरिक आपले वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज यांची पूर्व नियोजित वेळ निश्चित करून घेऊन जाऊ शकतता.
4. शासकीय कार्यालय – सर्व शासकीय कार्यालयामध्ये (आरोग्य व वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, राष्ट्रीय माहिती केंद्र, अन्न व नागरी पुरवठा, फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया, नेहरू युवा केंद्र, महापालिका सेवा त्यांना आवश्यक असेल त्या कर्मचारी संख्या वर काम करतील) 15 टक्के किमान 15 कर्मचारी या पैकी जी संख्या जास्त असेल ती वापरून कार्य़ालये सुरु ठेवता येईल.

3. शिथिलीकरणाचा दुसरा टप्पा दि.5 जून पासून खालील बाबी अटींसह सुरु होईल
1. मॉल व व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे, तुळशीबाग, हाँगकाँग लेन यासारखी गर्दीची ठिकाणे आणि रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने (P1,P2) मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांकाच्या दिवशी पुढील नियमाप्रमाणे उडतील. मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम तारखेला तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम तारखेला आणि मुख्य रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास रस्त्याच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम तारखेला तर पश्चिम बाजूकडील दुकाने विषम तारखेला उघडी राहतील.
2. पुणे शहरातील मनपाच्या मंडई मधील सम क्रमांकाचे गाळे सम तारखेला तर विषम क्रमांकाचे गाळे विषण तारखेला उघडी राहतील.
वर नमूद केलेले व्यवसाय हे सकाळी 9 ते सयंकाळी 5 पर्यंत खालील अटींच्या अधीन राहून खुली राहतील.
– दुकानामधील ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. त्याच प्रमाणे विक्री केलेले कपडे बदलून अथवा परत करता येणार नाहीत. जेणे करून संसर्गाचा प्रसार होणार नाही.
– दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे याची जबाबदारी दुकानदाराची राहील. तसेच गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांना उभे राहण्याच्या जागेवर सहा फुट अंतराच्या खुणा करणे, टोकन पद्धतीचा अवलंब करणे किंवा साहित्याचा घरपोच पुरवठा करू शकतात.
– नागरिकांनी खरेदीसाठी दुकानामध्ये शक्यतोवर घराच्या जवळील दुकानामध्ये जावे. जात असताना शक्यतो पायी किंवा सायकलचा वापर करावा. बिगर अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी लांबवर जाऊ नये. खरेदीसाठी जाताना स्वयंचलित वाहनाचा वापर करु नये.
– दुकानांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास तात्काळ सदरची दुकाने बंद केली जातील.
– नागरिकांच्या अत्यावश्यक सोयीसाठी खालील प्रकारच्या वाहनांचा वापर करता येईल
टॅब/कॅब – अत्यावश्यक सेवा वाहनचालक +2
रिक्षा – अत्यावश्यक सोवा वाहनचालक +2
चारचाकी स्वयंचलित वाहन – अत्यावश्यक सेवा वाहनचालक +2
दुचाकी स्वयंचलित वाहन – अत्यावश्यक सेवा केवळ वाहन चालविणारी व्यक्ती

4. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरी दुकाने सुरु करताना घ्यावयाची दक्षता, सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे राहतील व याप्रमाणे दुकानदारांना दक्षता घेता येईल.
1. व्यवसाय धारकाने दुकानाची वेळ निश्चित केल्याप्रमाणे म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्य़ंत सुरु ठेवावीत.
2. व्यवसाय धारक आणि व्यवसायात काम करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे.
3. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे.
4. दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
5. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मास्क आणि हातमोजे वापरावेत
6. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही आजाराची लक्षणं दिसल्यास तात्काळ मनपा दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.
7. कर्मचाऱ्यांना हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी साबण, सॅनिटायझरची व्यवस्था करावी व आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून द्यावी.
8. दुकानामध्ये शिरताना पायऱ्या आणि बाहेरील भाग 1 टक्का सोडियम हायपो क्लोराइट द्रावणाने दररोज फवारणी करून घ्यावी.
9. दुकानाचे काउंटर गिऱ्हाईक सोडून गेल्यानंतर 1 टक्का सोडियम हायपो क्लोराईट द्रावणाने पुसून घ्यावे.
10. दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाने देखील मास्क घालणे आवश्यक आहे.
11. दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे म्हणून नागरिकांना उभे राहण्याच्या जागेवर सहा फुट अंतराच्या खुणा करुन ठेवाव्यात.

5. शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा 8 जूनपासून खालील बाबी अटींसह सुरु होईल
1. सर्व खासगी कार्यालये त्यांच्या कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त 10 टक्के पर्य़ंत वापरून कार्यालये सुरु ठेवू शकतील, उर्वरित कर्मचाऱ्यांना घरी थांबवून काम करतील. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील काम संपल्यानंतर घरी जाताना विशेष काळजी घ्यावी जेणेकरून करोनाचा संसर्ग लवकर होऊ शकणाऱ्या व्यक्ती, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना याचा संसर्ग होणार नाही. याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे.

6. प्रतिबंधित बाबी – खालील नमूद सेवा, व्यवसाय अन्य बाबी प्रतिबंधित राहतील
1. शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या ई.
2. सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे, या अनुषंगिक ठिकाणे.
3. सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी
4. सर्वसामान्य व्यक्तीसाठी असलेली धार्मिक स्थळे.
5. केशकर्तनालय, ब्युटी पर्लर, स्पा
6. मॉल, हॉटेल, उपहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सेवा.

7. सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी
1. सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणांचे व्यवस्थापन ज्यांच्या नियंत्रणाखाली आहे अशा व्यक्तींनी नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
3. कुठलीही संघटना, व्यवस्थापक सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ देणार नाहीत.
4. लग्न समारंभासारख्या कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 पाहुणे/व्यक्ती एकत्र येऊ शकतात. मात्र या ठिकाणी देखील वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक राहील.
5. अंत्यसंस्कार व अनुषंगिक कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. मात्र, या ठिकाणी देखील वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक राहील.
6. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा देखील दंडनीय अपराध आहे.
7. पान, तंबाखू, मद्य इत्यादिचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करता येणार नाही.
8. मद्यविक्रीच्या दुकानात 2 व्यक्तींमधील अंतर 6 फुट इतके राहील. तर एकावेळी जास्तीत जास्त 5 व्यक्ती हजर राहू शकतील. यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची देखरेख राहील.

8. कामाच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी
1. कामाच्या ठिकाणी सर्वांना मास्क उपलब्ध करून दिले पाहिजेत व ते सर्वांनी वापरणे आवश्यक आहे.
2. कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये राहणे आवश्यक आहे.
3. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहण्याच्या दृष्टीने कामाच्या 2 शिफ्टमध्ये पुरेसे अतंर व जेवणाच्या वेळा देखील निश्चित करून घ्याव्यात.
4. कामाच्या ठिकाणी येण्याच्या व जाण्याच्या ठिकाणी त्यांचे शरीराचे तापमान घेण्यासाठी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझरची व्यवस्था असावी तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड वॉश व सॅनिटायझर उपलब्ध असावे, तसेच आठवड्यातून दोन वेळेला 1 टक्का सोडियम हायपो क्लोराईट द्रावणाने फवारणी करून घ्यावी.
5. कामाच्या ठिकाणची, सार्वजनिक वापरावयाच्या जागा आणि अन्य सर्व ठिकाणी ज्या भागाला स्पर्श होतो. जसे दरवाजाची कडी इ. याची स्वच्छता वारंवार होणे आवश्यक आहे.
6. आरोग्य सेतू नावाचे अॅप सर्व कर्मचाऱ्यांनी वापरणे बंधनकारक करणे याची जबाबदारी संस्था प्रमुखांची राहील.
7. कर्मचाऱ्यांच्या मोठ्या उपस्थिती असलेल्या बैठका घेण्यात येऊ नयेत.
8. कामाच्या ठिकाणी कोविड 19 वर उपचार होणाऱ्या मनपाच्या दावाखान्यांची यादी लावणे आवश्यक आहे.
9. कोणत्याही कर्मचाऱ्यास कोविडीची लक्षणे दिसल्यास त्यास तात्काळ तपासणीसाठी नेण्यात यावे. वैद्यकीय तपासणीस घेऊन जाईपर्य़ंत अशा कर्मचाऱ्यांस ठेवण्याकरिता स्वतंत्र जागा निश्चित करुन ठेवावी.
10. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसेल त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित अंरत ठेवून वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था करावी.
11. चांगल्या प्रकारची स्वच्छता कशाप्रकारे ठेवावी याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि सतत संपर्क ठेवला पाहिजे.
12. काम करीत असलेल्या व्यक्ती या केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील राहणाऱ्या असणे आवश्यक आहे.

9. यापूर्वी आदेशान्वये सुरु करण्यात आलेल्या सेवा/ व्यवसाय
1. अत्यावश्यक व्यवसाय – सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय यामध्ये औषध, वैद्यकीय उपकरणे व त्यांना लागणारा कच्चा माल इ. तसेच ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन करणेसाठी कामामध्ये सातत्य ठेवावे लागते अशा बाबी, माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती तसेच पॅकेजिंग करिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग जसे ब्रेड उत्पादक कारखाना, दुध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी, दालमिल या ठिकाणी कामगारांच्या कामाच्या वेळा निश्चित करून व त्यांच्य सुरक्षित अंतर ठेवून करता येऊ शकते.
2. घरकाम करणाऱ्या व्यक्ती – प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घर मालकाची इच्छा असल्यास स्वच्छेने काम करता येईल.
3. ज्येष्ठ नागरिक – ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीकरिता लागणाऱ्या व्यक्ती, रुग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक इ. यांची मदत घेता येईल.
4. वर्तमानपत्रे – वर्तमानपत्राचे वितरण हे वर्तमानपत्रे घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने वितरीत करता येतील. मात्र, याकरिता वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक राहील. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीय, केबल सर्व्हिस सुरु राहतील.
5. वित्तीय क्षेत्र – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी नियंत्रित केलेल्या आर्थिक संस्था या कमीत कमी कर्मचारी वापरून कामकाज सुरु ठेवू शकतील. तर एटीएम, बँका, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या यांची कार्यालये सुरु राहतील.
6. ई-कॉमर्स – ई- कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच वस्तूचे वितरण करता येईल. तसेच कुरिअर सेवा सुरु राहतील.
7. माहिती तंत्रज्ञान – माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यावसाय त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवता येतील. तसेच डाटा व कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांचा वापर करून सुरु ठेवता येतील.
8. खाद्य पदार्थांची सेवा – खाद्य पदार्थांची पार्सल सेवा देणारे व्यवसाय सुरु ठेवता येतील.
9. बांधकाम विषयक – प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील मजूर न आणता कामाच्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपारंपरिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील. पुणे मनपाने ज्या पूर्व पावसाळी कामांना, मेट्रोच्या कामांना, धोकादायक इमारतीबाबत करावयाची कारवाई तसेच पूरपरिस्थीती होऊ नये म्हणून ज्या कामांना पूर्व परवानगी देण्यात आलेली आहे, अशी कामे सुरु राहतील.
10. पथरी व्यवसायिक – खालील नमूद रस्त्यांशिवाय अधिकृत पथारी व्यावसायिक यांना दररोज खालील अटीवर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवसाय करता येईल.
अ – दोन पथारी व्यावसायिकांमध्ये अंतर 5 मीटर ठेवावे
ब – हातमोजे व मास्क घालून विक्री करता येईल.
– शिवाजी रोड-पुणे मनपा-डेंगळे पुल-शनिवार वाडा ते जेधे चौक
– बाजीराव रोड-पुरम चौक-माडीवाले कॉलनी-शनिवार चौक-विश्रामबागवाडा-शनिवारवाडा
– हडपसर-सोलापूर रोड-मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्द पर्यंत तसेच गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रोडने पुणे शहर हद्दीपर्यंत
– सातारा रोड-जेधे चौक-लक्ष्मीनारायण थिएटर-सिटी प्राईड-विवेकानंद पुतळा, धनकवडी फ्लाय ओव्हर ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रोडने पुणे शहर हद्दीपर्य़ंत
– नगर रोड-येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी पुणे शहर हद्दपर्य़ंत
– एअरपोर्ट रोड- गुंजन चौक-गोल्फ क्लब रोड-येरवडा पोस्ट ऑफिस-नागपूर चाळ-जैलरोड पोलीस चौकी-संजय पार्क-509 चौक-एअरपोर्ट
– सिंहगड रोड – दांडेकर पुल-पानमळा-रोहन कृतिका लगत, नाकोडा नगर-राजाराम पूल-विठ्ठलवाडी फुटपाथ-सतोष हॉल-आनंदनगर, माणिकबाग-वडगाव धायरी उड्डाणपुल, धायरी फाटा-धायरी शेवटचा बसस्टॉप
– पौड रोड-खंडोजी बाबा चौक-स्वातंत्र्य चौक-नळ स्टॉप-कर्वे फ्लायओव्हर-आनंदनगर-शास्त्री नगर कोथरूड बस डेपो-चांदणी चौक
– जंगली महाराराज रोड-संचेती चौक-झाशी राणी चौक- डेक्कन जिमखाना-संभाजी पुतळा-खंडोजी बाबा चौक
-एफ.सी.रोड-खंडोजी बाबा चौक-गुडलक चौक-वैशाली हॉटेल-फर्ग्युसन कॉलेज-संत ज्ञानेश्वर पादुका चौक-शिवाजीनगर पोलीस स्टेशन
– गणेश खिंड रोड-शिमला चौक-म्हसोबा चौक-सेंट्रल मॉल-शासकीय तंत्रनिकेतन-विद्यापीठ चौक-राजभवन-इंदिरा गांधी झोपडपट्टी-राजीव गांधी पूल औंध-पुणे शहर हद्दपर्यंत
11. सुरक्षा व सेवा व्यवस्था – रहिवासी संकुल व कार्यालयांना व्यवस्थित ठेवण्यासाठी लागणाऱ्या सेवा व सुरक्षा पुरविणाऱ्या खासगी संस्था सुरु राहतील.