Coronavirus Lockdown : अक्कलकोटमध्ये जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिस निरीक्षकालाच मारहाण, 8 पोलिस गंभीर जखमी

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन – जमावबंदीचा आदेश मोडून पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याने अनेक पोलिस जखमी झाले आहेत. उत्साही तरुणांच्या जवळपास 200-300 च्या जमावाने जमावबंदीचा आदेश मोडून पोलिसांवर तुफान दगडफेक केली या घटनेत पोलिस निरीक्षक के एस पुजारी यांच्यासह आठ पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील श्री परमेश्वर रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय झाला असताना ही काही अतिउत्साही तरूणांनी नियम डावलून ( रविवार 29.03.2020) काल रथोत्सव काढला. याचदरम्यान पोलिसावर दगडफेक केल्यामुळे वागदरी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. रविवारी रात्री उशिरा पर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जवळपास 200 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बेकायदेशीर जमाव जमवून संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आले असून आणखी दीडशे आरोपी फरार झाले आहेत.

Advt.

या मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले महादेव लक्ष्मण भरमदे, परमेश्वर भीमाशंकर भरमदे, शरणाप्पा भरमदे यांच्या सह जवळपास आठ लोकांना अटक करण्यात आले आहे. यातील महादेव भरमदे हा क्रिमिनल पार्श्वभूमी असलेला असून गेल्या वर्षी ही याच गावच्या यात्रेत त्याने दंगा करून एकाचे डोके फोडले होते त्यावेळी त्याच्यावर 324 चा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के एस पुजारी हे या दगडफेकित गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान रात्री उशिरा अनेक आरोपींना अटक करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

वागदरी (ता.अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रा 25 मार्च रोजी होती. देशात कोरोनो आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे जमावबंदीचा आदेश असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. परंपरेप्रमाणे पंच कमिटीच्या वतीने दोघांनी आज शनिवारी पूजा करण्याचे ठरले होते.

पूजा चालू असताना जवळपास शंभर अतिउत्साही तरूण जमा होऊन त्यांनी रथ ओडण्यास प्रारंभ केला. संचारबंदी असताना जमाव जमा झाल्याने पोलिसानी रथयाञा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी रथ रोखल्याने चिडलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतले.