Coronavirus : 15 दिवस घरी गेली नाही ‘नर्स’, मुलीचे ‘रडणे’ पाहून इतरांच्या ‘डोळ्यात’ही तरळले ‘अश्रू’ (व्हिडिओ)

बेळगाव :  वृत्तसंस्था –  कोरोनामुळे सध्या शहरातही अनेक रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. मित्र किंवा नातेवाईक देखील काही करणांनी आपल्याकडे येऊ नयेत अशी मानसिकता सर्वांची झाली आहे. कोरोना संसर्गामुळे नाते श्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी दुपारी ‘बिम्स’ जवळील एका लॉजसमोरील प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ‘आई, मला जवळ घे ना…!’ कोरोनाबाधितांवर उपचारासाठी राबणाऱ्या नर्सच्या तीन वर्षाच्या मुलीने लांबूनच आली पहात मारलेली हाक आणि आईची अगतिकता आणि तिची घालमेल पाहताना अनेकांच्या काळजात कालवाकालव झाली. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बिम्स मध्ये नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या सुगंधा कोरीकोप्पा या हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन विभागात सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या तीन वर्षाच्या मुलीला देखील भेटता येत नाही. सात रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासनाने आयसोलेशन विभागात सेवा बजवाणाऱ्या नर्स यांची रहाण्याची सोय जवळच्या एका लॉजमध्ये केली आहे. यामुळे 24 तास हाय अलर्टवर असणाऱ्या नर्सेसना सदैव जगृत आणि तत्पर रहावे लागत आहे. सुगंधा या देखील येथे सेवा बजावत आहेत.

सुगंधा यांना मागील चार दिवसांपासून आपल्या घरी जाता आले नाही की आपल्या तीन वर्षाच्या एश्वर्याला भेटता आले नाही. घरी सगळे आहेत पण चार दिवसांपासून आई दिसली नसल्याने तिने आईकडे जाण्याचा हट्ट धरला. ती सतत आईची आठवण काढून रडत होती. एवढेच नाही तर तिने जेवण करण्यास देखील नकार दिला. अखेर तिच्या हट्टापुढे वडील संतोष यांनी पत्नी रहात असलेल्या लॉजकडे नेले.

आईला पाहताच एश्वर्याने आईच्या दिशेने दोन्ही हात करून आईला हाक मारली. आई ये, आई ये म्हणून ती रडू लागली. चार दिवसांनी भेटणाऱ्या आईला बिलगण्यासाठी ती उतावळी झाली होती. मात्र, तिच्या वडिलांनी तिला धरून ठेवले होते. आई समोर असतानाही तिला भेटता येत नसल्याने तिने जोरात रडण्यास सुरुवात केली. मुलीचा आकांत पाहून आणि आईकडे जाण्याची ओढ पाहून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलगी समोर दिसत असताना देखील सुगंधा यांनी मनाला मुरड घातली. मुलीला जवळ घेणे किंवा तिच्या जवळ जाणे जोखमीचे होते. म्हणून सुगंधा यांनी लांबूनच आपल्या मुलीला पापा दिला आणि टाटा केला. आईला दूरूनच पाहून ऐश्वर्याच्या वडिलांनी तिला घेऊन निघून गेले. बेळगावातील अशाच हृदयस्पर्शी दृष्याने उपस्थितांना आपला हुंदका आवरता आला नाही.