5 दिवसांमध्ये 5.51 लाख कोटी बुडाले, शेअर बाजाराला अचानकपणे झालं काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागच्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याच दिवशी भारतीय शेयर बाजारात 10 वर्षातील सर्वात मोठी घसरण दिसून आली होती. परंतु, यानंतर शेयर बाजारात सुधारणाही झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा घसरण दिसत आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे 5.51 लाख करोडचे नुकसान झाले आहे.

5 दिवसात 5.51 लाख करोडचे नुकसान

19 फेब्रुवारीला बीएसई इंडेक्सवर मार्केट कॅप 1,58,71,065.31 करोड रूपये होते. आठवड्यानंतर 26 फेब्रुवारीला बीएसई इंडेक्सचे मार्केट कॅप घसरून 1,53,19,487.08 करोड रूपयांवर आले. अशापद्धतीने गुंतवणूकदारांचे केवळ 5 कार्यालयीन दिवसात 5.51 लाख करोडचे नुकसान झाले आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला शेयर बाजार बंद होता. तर 21 फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने, 22 आणि 23 फेब्रुवारीला साप्ताहिक सुटी असल्याने बाजार बंद होता.

काय आहे नुकसानीचे कारण?

बाजारातील या सर्वात मोठ्या घसरणीचे कारण कोरोना व्हायरस असल्याचे सांगितले जात आहे. व्यवसायिकांनी सांगितले की, कोरोना व्हायरस वेगाने पसरल्याने जागतिक स्तरावर व्यापारावर परिणाम झाला, त्याचा प्रभाव येथील बाजारावर दिसून आला आहे. मूडीजने देखील कोरोना व्हायरसमुळे मंदीचा अंदाज वर्तवला आहे.

मूडीज विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर कोरोन व्हायरसने एका महामारीचे रूप धारण केले तर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेर्‍यात अडकू शकते. मूडीज एनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क जेंडी यांनी बुधवारी म्हटले की, कोरोना व्हायरसचे संक्रमण आता इटली आणि कोरियात सुद्धा पसरले आहे. यामुळे हा आजार महामारीचे रूप धारण करण्याची शंका वाढली आहे. कोरोना व्हायरसने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आता हा धोका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी निर्माण झाला आहे.

जीडीपी आकड्यांमध्ये सुस्तीची शंका

कोरोनाशिवाय जीडीपी वाढीच्या आकड्यांमध्ये सुस्तीच्या शंकेने बाजारावर परिणाम झाला आहे. तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सुद्धा कमकुवत विकास दरवाढीची शंका व्यक्त केली जात आहे. एसबीआयचे अर्थतज्ज्ञांनुसार ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढ 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

मॉरीशसला आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. याचाही परिणाम सोमवारी आणि मंगळवारी बाजारावर दिसून आला. परंतु, सेबीने मंगळवारी स्पष्ट केले की, मॉरीशसचे परदेशी गुंतवणूकदार एफपीआय नोंदणीकृत म्हणून पात्र राहतील. परंतु, त्यांच्यावरील देखरेख वाढवली जाईल. कच्च्या तेलाच्या भावातील चढ-उतारामुळे सुद्धा शेयर बाजारावर परिणाम झाला आहे.

बुधवारी अशी होती बाजाराची स्थिती

बुधवारच्या व्यवसायाबाबत बोलायचे तर मुंबई शेयर बाजाराचा 30 शेयरचा सेन्सेक्स दिवसभरात एकदा 521 अंक खाली गेला होता. शेवटी तो 392.24 अंक किंवा 0.97 टक्के नुकसानीने 39,888.96 अंकावर बंद झाला. अशाप्रकारेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 119.40 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या नुकसानीने 11,678.50 अंकावर आला.

You might also like