Coronavirus : ठाकरे सरकारचा मोठा ‘निर्णय’ ! ‘रेमडेसिवीर’ची 10 हजार ‘इंजेक्शन’ खरेदी करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने रेमडेसिवीर औषधाची 10 हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना रुग्णावर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचे राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र शासन रेमडेसिवीरची 10 हजार इजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS-CoV व SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. कोविड 19 च्या उपचारात रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली असल्याचे राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रोमडेसिवीर औषधाची विक्री करण्याची परवानगी अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेसनं आठवड्यापूर्वीच भारत सरकारकडे मागितली आहे. तत्पूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी महिनाभर रेमडेसिवीर आणि त्याचा कोरोना रुग्णावरील उपचारातील उपयोग यावर संशोधन केलं कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू देण्याची मागणी डॉक्टर अनेक दिवसांपासून करत आहेत. हे औषध कोरोना रुग्णावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत असल्याचे अमेरिकेत आढळून आले आहे. मात्र, यावर भारतात अद्याप तरी कोणतंही संशोधन झालेलं नाही.