Coronavirus : राज्यपालांकडून ‘कोरोना’ग्रस्तांना मदतीचा हात, घेतला ‘हा’ निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीत राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. राजभवनातील सर्व कर्मचार्‍यांसह त्यांनी स्वतः एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे केले जाहीर. राज्यपालांसह राजभवनातील सर्व अधिकारी-कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याची राजभवनाची माहिती दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही असाच निर्णय घेत पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारनेही गुरुवारी देशातील दारिद्ररेषेखालील जनतेच्या मदतीसाठी 1.70 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. यामध्ये पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच 1 किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच 15 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी सरकार रक्कम भरणार आहे.

त्याचबरोबर कोरोनाशी सर्वात पुढे लढणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 50 लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी महिला लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडरही देण्यात येणार आहेत. तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत. यामुळे 20 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे