अमेरिका तुमचे ‘उपकार’ विसरणार नाही, नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व ‘जबरदस्त’ : डोनाल्ड ट्रम्प

पोलीसनामा ऑनलाइन – भारताकडून अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले आहेत. त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असे म्हटले आहे.

हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केल्यामुळे अमेरिकेने भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन कोरोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर ट्रम्प यांची भाषा बदलली आहे.

ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुक करीत मोदी महान नेता असल्याचे नमूद केले आहे. कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरु शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्त्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार. अशा आशयाचे ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे