Covid-19 : ‘कोरोना’ व्हायरसचे 2 प्रकार, जाणून घ्या कोणता सर्वाधिक ‘धोकादायक’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूवर अद्याप कोणताही अचूक उपचार मिळू शकलेला नाही. तर दुसरीकडे कोरोना व्हायरस सतत रुप बदलत असल्याचे समोर येत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी निरंतर संशोधन करीत आहेत.  एका संशोधनानुसार 103 संक्रमित लोकांमध्ये दोन प्रकारचे कोरोना विषाणू असल्याचे आढळून आले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार वेगवेगळा होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. कोरोना विषाणूचे किती प्रकार उघडकीस आले आहेत आणि त्यामधील कोणता विषाणू धोकादायक असू शकतो हे जाणू घेऊयात.

कोरोना विषाणूचे दोन प्रकार
वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, व्हायरस नेहमीच आपले रुप बदलत असतो. विशेषत: कोरोना व्हायरस, एसएआरएस-COV-2 इत्यादी. एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होते. तेव्हा तो विषाणू त्याच्या श्वसन प्रक्रियेस अडथळा आणतो. हा विषाणू थेट फुफ्फुसात जातो आणि त्याच्यासारखे अनेक विषाणू तयार करतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ऑक्सिजन मिळू शकत नाही.

संशोधनाच्या दरम्यान, बीजिंगमधील वैज्ञानिकांनी 103 प्रकरणांच्या नमुन्यांचा अभ्यास केला तेव्हा असे आढळून आले की या नमुन्यांच्या व्हायरल जीनोममध्ये बदल दिसून आले. या जीनोम मधील फरकाच्या आधारे त्यांना कोरोना विषाणूचे दोन प्रकार असल्याचे आढळून आले. एका विषाणूला ‘एल (L)’ आणि दुसऱ्याला  ‘एस (S)’ असे प्रकार मानले गेले.
अभ्यासात असेही आढळले की, यामधील एल प्रकारचा विषाणू हा सामान्यत: प्राण्यांपासून मानवामध्ये पसरतो. यानंतर दुसरा एस प्रकारचा विषाणू अचानक आढळून आला. हा विषाणू एवढा धोकादयक नाही जेवढा एल प्रकाराचा विषाणू धोकादायक आहे.

व्हायरसच्या प्रकराची माहिती जाणून घेणे का महत्त्वाचे ?
वैज्ञानिकांना व्हायरसचा प्रकार माहित असणे देखील फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यानुसार वेगवेगळ्या लसी तयार केल्या जाऊ शकतात. आज, कोरोना विषाणूच्या वैशिष्ट्यांवर आधारित लस विकसित करण्याचे काम सर्व देशांतील वैज्ञानिक करीत आहेत.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोना विषाणूच्या दोन प्रकारांमधील फरक फारच कमी आहे आणि हे प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करत नाहीत. सर्व प्रकारचे करोना विषाणू एकमेकांपेक्षा भिन्न आहेत यावर बहुतेक शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. मात्र, शास्त्रज्ञ यावर देखील सहमत आहेत की कोरोना विषाणूचे स्वरुप बदलत आहे आणि त्यात काही अनुवांशिक भिन्नता असू शकते.

एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूची विविध लक्षणे समोर येत आहेत. सुरुवातीला थंडी, सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आढळली. मात्र नंतर डोकेदुखी, त्वचेचे डाग, वास घेण्याची क्षमता कमी होणे इत्यादी लक्षणे देखील नोंदवण्यात आली आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात आपण बऱ्याच व्हायरसच्या हल्ल्यांचा सामना करु शकतो. एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली, तर त्याला पुन्हा कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ज्याप्रमाणे हंगामी फ्लू असतो, त्याचप्रमाणे दरवर्षी या फ्लूमध्येही काही बदल होत असतात. ज्यामुळे लोकांना संसर्ग होतो. यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना आधी कसा फ्लू झाला होता याची जाणीव नसते. येणाऱ्या काही वर्षामध्येही आपण नवीन कोरोना विषाणूची तीच पद्धत पाहू शकतो, जे त्याचे रुप बदलत राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like