Covid -19 : इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ‘मजबूत’, PM नरेंद्र मोदींचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या नागरिकांनी कोरोना लढाई स्वत:च्या हाती घेतल्यामुळे उद्रेकाच्या काळात देखील आपली परिस्थिती अनेक देशांपेक्षा चांगली व मजबूत आहे. मात्र, कोरोनाला संपूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी सातत्याने काळजी घेतली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपोलिटन यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त थोमा चर्चतर्फे आयोजित समारंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आरोग्य, महिला सशक्तीकरण यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या थेमा चर्चने भारतीयांच्या जीवनातही सकारात्मक बदल आणण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही जनआधारित लढाई आहे व आम्ही कोरोना विषाणूवर बारीक लक्ष ठेवणे कदापिही कमी करणार नाही. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे अजूनही कटाक्षाने टाळले पाहिजे. आपल्याला यापुढे सदैव सावधच रहावे लागेल.

भारत सरकारने कोरोना काळात अर्थव्यवस्थेशी संबंधित लोकांना अनुकूल असे अनेक विकासाधारित निर्णय घेतले असून, यात अल्पकालिक व दीर्घ कालिक निर्णयांचा समावेश आहे. कोरोना हा केवळ शारिरीक आजार नसून तो लोकांच्या जिवालाही धोका निर्माण करतो. कोरोना योद्ध्यांच्या मदतीने भारत या कोरोना लढाईत मजबूतपणे उभा आहे. या वर्षाच्या प्रारंभी अनेकांनी भारतात कोरोनाचे अत्यंत गंभीर परिणाम होतील, अशी भविष्यवाणी केली होती. मात्र, लॉकडाऊन व लोकांनी पाळलेले नियम यामुळे कितीतरी देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.