DRS च्या चुकीवर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचं ‘चमत्कारिक’ उत्तर, म्हणाला – ‘विसरलो…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला बांगलादेशने 7 गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 148 धावा केल्या. बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदाच भारताचा टी20 मध्ये पराभव केला. रहीमला त्याच्या खेळीदरम्यान टीम इंडियाने रहीमला अनेकदा जीवदान दिले. रहीमचा झेल सुटला तसेच डीआरएसच्या दोन संधी टीम इंडियाने गमावल्या त्यामुळे सामना भारताच्या हातून निसटला.

डीआरएसविषयी रोहित शर्मा म्हणाला –

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातील पराभवासाठी गचाळ क्षेत्ररक्षण आणि डीआरएसचे चुकीचे निर्णय जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. रोहित शर्माला सामन्यानंतर जेव्हा त्याला डीआरएसच्या निर्णयावर प्रश्न विचारले गेले तेव्हा त्याने एक अतिशय रंजक विधान केले. रोहित शर्मा म्हणाला की, ‘डीआरएसविषयी आढावा घेण्यात आमच्या टीममध्ये चूक झाली होती, मला याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. पहिला बॉल मुश्फिकुर रहीमने बॅकफूटवर खेळला, आम्हाला वाटले की बॉल डाव्या बाजूने जात आहे. दुसर्‍या बॉलवर तो फ्रंट फुटवर खेळला. आम्ही विसरलो की मुश्फिकुर रहीम लहान आहे. मुशफिकुर रहीम सर्वात लहान अंगयष्टी असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

बांगलादेश विजयाचा हकदार –
सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की बांगलादेशने चांगला खेळ दाखविला, त्यामुळे तो विजय पात्र ठरला. बांगलादेशने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आमच्यावर दबाव ठेवला. आम्ही केलेली धावसंख्या चांगली होती परंतु आम्ही क्षेत्ररक्षणात चुका केल्या. आमचे खेळाडू अनुभवाने थोडेसे कमी आहेत मात्र ते या पराभवातून नक्की शिकतील. दिल्ली टी20 सारखी कोणतीही चूक होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Visit : Policenama.com