पुणे विद्यापीठातील ‘त्या’ १२ विद्यार्थ्यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरीबाबत प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीला विरोध करत सोमवारी आंदोलन करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर विद्यार्थ्यांविरोधात तक्रार करण्यात आली. दरम्यान गुन्हा तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरीत एका ताटात दोन विद्यार्थ्यांनी जेवू नये, मासिक पास नसलेल्या विद्यार्थ्यांना रिफेक्टरीत जेवता येणार नाही, तसेच त्यांनी कॅन्टीन, हॉस्टेलमध्ये जाऊन जेवण करावे अशी नियमावली जाहीर केली. विद्यार्थ्यांचा भार वाढत असल्याने जेवणाचा चांगला दर्जा देता यावा म्हणून ही नियमावली तयार केल्याची सबब प्रशासनाने पुढे केली आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

काही दिवसांपुर्वी रिफेक्टरीच्या जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. त्यावर विद्यार्थ्यांनी तक्रारीही केल्या होत्या. परंतु त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यानंतर सोमवारी या नियमावलीच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही सुरक्षा रक्षक जखमी झाले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.