पीएम केअर फंडात 2 लाख रुपये देण्यासाठी ‘ती’ 10 KM पायी चालली, शहीद जवानाच्या 80 वर्षीय पत्नी दर्शनी देवींना लोकांचा ‘सलाम’

रुद्रप्रयाग : कोरोना व्हायरस संक्रमणाला तोंड देत असलेल्या देशाची मदत करण्यासाठी एका शहीदाची 80 वर्षीय पत्नी 10 किलोमीटर पायी चालत बँकेत गेली आणि पीएम केयर फंडमध्ये तिने आपल्या पेन्शनमधून दोन लाख रुपये जमा केले. दर्शनी देवीचे हे कार्य पाहून बँक अधिकार्‍यांनी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला.

1965 च्या युद्धात पती शहीद

दर्शनी देवी रुद्रप्रयागमधील अगस्त्यमुनी परिसरातील डोभा डडली गावात राहतात. त्यांचे पती कबूतर सिंह रौधाण 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले. पीएम केयर फंडाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दान देण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्येच त्या घराच्या बाहेर पडल्या. दहा किलोमीटर चालत जाऊन अगस्त्यमुनी येथील बँकेत त्या आल्या आणि दोन लाख रूपये दान केले.

ड्राफ्टद्वारे दिले दान

दर्शनी देवी यांनी एसबीआयमध्ये दोन लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट बनवला आणि बँकेच्या ईओद्वारे पीएम केयर फंडात दान दिले. त्या म्हणाल्या, कोरोना व्हायरस आल्यानंतर जी समस्या उद्भवली आहे, ती ठिक करण्यासार्ठी सर्व लोक दान देत आहेत, म्हणून मी सुद्धा केयर फंडात पैसे दान करण्याचा निर्णय घेतला.

संकटाच्या काळात सहकार्य महत्वाचे

दर्शनी देवी म्हणाल्या, हा संकटाचा काळ आहे आणि यामध्ये जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. बँक कर्मचारी आणि नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी या आजीबाईंचा पुष्पहार घालून सन्मान केला. उत्तराखंड प्रदेशातील राइंका लंगासूमध्ये प्रशासनात कार्यरत कमला देवी यांनीही पीएम केयर फंडात दिड लाख रूपये दान केले.