दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये दीड दिवसांचे अर्भक सापडलं

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) –  दौंड तालुक्यातील राजेगाव फार्म याठिकाणी दीड दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक बेवारस स्थितीमध्ये आढळून आले आहे. या अर्भकाला कुणीतरी अज्ञात इसमाने बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. खानोटा गावचे पोलीस पाटील उर्मिला गायकवाड व खानोटा चे प्रतिष्ठित नागरिक देवकाते यांनी या घटनेबाबत पोलिसांना संपर्क साधल्यानंतर त्यास तात्काळ भिगवण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.

या रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविका भरणे व त्यांच्या पतीने स्वतःच्या मुलासारखी त्याची काळजी घेतली असून अर्भकास बेवारस स्थितीमध्ये सोडून दिल्या प्रकरणी अर्भकाच्या अज्ञात मातापिता विरुद्ध भादवि कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे व सदर बालकास बाल न्याय मंडळासमोर सादर केलेले आहे. तेथून सदर बालकाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली असून या मुलाच्या अथवा त्याच्या माता पित्याबद्दल काही एक माहिती असल्यास त्वरित दौंड पोलिसांना काळविण्याचे आवाहन केले आहे.