येरवडा कारागृह उपअधीक्षकांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, कर्मचाऱ्याविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटी लावण्यावरून एका कर्मचाऱ्याने थेट अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ससून रुग्णालयात कैद्यांच्या बदोबस्तासाठी या कर्मचाऱ्याची ड्युटी लावण्यात आली होती. या प्रकरणी कारागृह कर्मचाऱ्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार सोमनाथ शिंदे (वय-39 रा. शासकीय कर्मचारी निवासस्थान, येरवडा) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर (वय-55 रा. शासकीय वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार सोमवारी (दि.3) दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमणी हे येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारागृहातील आरोपी प्रकाश फाले याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी जयकुमार शिंदे याला ससून रुग्णालयात रात्रपाळी ड्युटीला जाण्याचा लेखी आदेश चंद्रमणी यांनी दिला होता. याचा राग आल्याने जयकुमार याने येरवडा कारगृह उपअधिक्षक चंद्रमणी यांना दररोज मला ससून रुग्णालयात जाण्यास सांगतोय, तुझा आदेश असला तरी मी ससून रुग्णालयात जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर लेखी आदेश चंद्रमणी यांच्या अंगावर भिरकावला.

यावर वरिष्ठांशी बोलण्याची ही पद्धत आहे का अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे चिडलेल्या राजकुमार याने रागाच्य भरात त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत मी ससून रुग्णालयात ड्युटीला जाणार नाही. मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर त्याला काही कमी जास्त झाले तर मी तुझ्या खानदानला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहेत.