अतिरिक्त ऊस उत्पादनावर ‘सोमेश्वर’चा विस्तारीकरणाचा निर्णय : चेअरमन पुरुषोत्तम जगताप

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – सोमेश्वरनगर ( ता.बारामती) येथील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सतत अतिरिक्त ऊस उत्पादन वाढत असल्याने विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.

सोमेश्वरनगर ( ता.बारामती) येथील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ५९ व्या गळीत हंगामाचा को- जन बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ रविवारी (दि.४) रोजी
कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप व उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर, व त्यांच्या पत्नी चित्राली रासकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी जगताप बोलत होते.

यावेळी कारखान्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, संचालक नामदेवराव शिंगटे, सिध्दार्थ गीते, किशोर भोसले, महेश काकडे, विशाल गायकवाड, सुनिल भगत, हिराबाई वायाळ, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सर्व अधिकारी,खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सतत अतिरिक्त ऊस वाढत
असून अखेर यावर तोडगा म्हणून विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमेश्वरची पाच हजार टन गाळप क्षमतेहून साडेसात हजार टन प्रतिदिन इतकी गाळप क्षमता होणार आहे. त्यामुळे १० लाख मे. टन गाळप करू शकणारा कारखाना आता १४ ते १५ लाख टनाचे ऊस गाळप करेल. यामुळे यापुढील काळात कारखाना कार्यक्षेत्रात होणाऱ्या अतिरिक्त ऊसाचा सभासदांना निश्चितच फायदा होईल.

जगताप पुढे म्हणाले की, ‘सोमेश्वर’ चे चालु वर्षी १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून संपूर्ण ऊस गाळपास प्राधान्य देणार आहे. सोमेश्वर कारखाना यंदा १२ हार्वेस्टर, ९०० बैलगाडी, २९४ ट्रक – ट्रँक्टर, १५० डम्पिंग च्या साह्याने ऊसाचे गाळप करणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटींचे पालन करून गव्हाण पूजन केले जाईल. नियम शिथील झाले तर राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांनाही यासाठी निमंत्रण देणार असून सोमेश्वरची रिकव्हरी जिल्ह्यात एक क्रमांकाची राहील. त्यामुळे डिस्टलरीमधून जास्तीतजास्त इथेनॉल निर्मिती करण्याचा मानस आहे. ऊसतोडणी कामगारांचा संप मिटताच १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरु करणार आहोत.