धक्कादायक ! व्यावसायिकानं 2 मुलांची हत्या करून ‘मेट्रो’ समोर उडी मारून स्वतः केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शालीमार बागमध्ये एका पित्याने आपल्या 2 मुलांची हत्या करून नंतर मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे.

माहितीनुसार मृत वडीलांचे नाव मधुर असून मधुर यांनी प्रथम 14 वर्षांची आपली मुलगी समीक्षा आणि 6 वर्षांच्या श्रेयांसची घरात गळा दाबून हत्या केली. यानंतर मधुर यांनी मेट्रो स्टेशनवर जाऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 6:45 वाजता पूर्व शालीमार परिसरातून फोन आला की, मधुर यांनी आपल्या एका मुलाचा खून केला आहे. या फोननंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले, तेव्हा घरात 2 मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या बेडवर पडलेले होते.

तपासात माहिती मिळाली की, मुलांची आई बाजारात गेली होती जी घटनेनंतर घरी पोहचली. परंतु, वडील फरार होते. पोलिसांनी तपास सुरू केला होता, तेवढ्यात मेट्रो पोलिसांनी माहिती दिली की आरोपी पिता मधुरने हैदरपूर मेट्रो स्टेशनवर चालत्या ट्रेन समोर उडी मारून जीव दिला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

तपासात समोर आले की, आरोपी मधुरची रेगमॉल फॅक्टरी होती. जी 6 महिन्यापूर्वी बंद पडली होती. तेव्हापासून तो डिप्रेशनमध्ये होता. अनेक वेळा तो मोटीव्हेट होण्यासाठी व्हिडिओ बघत होता, परंतु डिप्रेशनपासून सुटका झाली नाही. मधुर यांनी ज्या मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केली तेथे कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही.

एका पित्याने आपल्या 2 निरागस मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.या घटनेनंतर दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने (डीएमआरसी) ने ट्विट केले की, हैदरपुर बादली मोडवर प्रवाशी रूळावर आल्याने जीटीबी नगर दरम्यानची रेल्वे सेवा उशीराने सुरू आहे. सुमारे 15 मिनिटानंतर डीएमआरसीने एक आणखी ट्विट करून सांगितले की, सेवा सुरळीत झाली आहे.