AC च्या गरम हवेवरुन शेजाऱ्यांमध्ये ‘पेटलं’, वृद्धाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एसीच्या गरम हवेमुळे दोन शेजांमध्ये झालेल्या वादातून एका वृद्ध व्यक्तीला शेजाऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात फर्श बजाराजवळील एनएसए कॉलनीत घडली.

मृत्यू झालेली व्यक्ती कुटुंबीयांसोबत त्याच कॉलनीत वास्तव्यास होती. एसीमधून बाहेर निघाणाऱ्या गरम हवेवरुन शेजाऱ्यांमध्ये नेहमी वाद होत होते. मंगळवारी दुपारी छतावर एसीच्या मगाच्या बाजूने निघणाऱ्या गरम हवेवरुन त्यांच्या पुन्हा वाद झाले. अचानक वाद वाढल्याने रागाच्या भरात शेजाऱ्याने वृद्ध व्यक्तीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मपाल (वय-60) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे. धर्मपाल यांच्या शेजारी राहणाऱ्या धर्मेंद्र उर्फ धंमू यांच्यात एसीच्या हवेवरुन वाद सरु होते. दोघांच्या घरात एसी लावण्यात आला होता. एसीमुळे घरात गरम हवा येत असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. कालही त्यांच्या भांडण झाले. वादा दरम्यान धंमूच्या कुटुंबीयांनी धर्मपाल यांना धक्का दिला. त्यामुळे ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी धंमूला अटक केली आहे. त्याच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. धर्मपाल यांना खाली फेकून दिल्यानंतर त्याचा एक नातेवाईक फरार झाला आहे. आरोपींनी धर्मपाल यांच्या मुलाला देखील बेदम मारहाण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच फरार नातेवाईकाचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.