राष्ट्रपती भवनाजवळ नग्नावस्थेत फिरत होती मनोरुग्ण, लोक काढत होते फोटो ! DCW नं पोहचवलं हॉस्पिटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हाय सिक्योरिटी भागात राष्ट्रपती भवनाजवळ एक मनोरुग्ण महिला नग्नावस्थेत फिरत होती. मात्र गर्दी केलेले लोक तिचे फोटो काढण्यात मग्न होते. माहिती मिळाल्यानंतर पोहचलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या टीमने त्या महिलेला कपडे घातले आणि तिला घेऊन पार्लमेंट ट्रीट ठाण्यात गेले. महिलेजवळ मिळालेल्या आधारकार्ड नुसार ती कंझावाला भागातील रहिवासी असल्याचं समजलं. माहितीनुसार, ही घटना शुक्रवारच्या रात्रीची आहे. जवळजवळ 35 वर्ष वयाची ही महिला नग्नावस्थेत फिरत होती. लोक तिचे फोटो काढत राहिले पण कोणीही तिचं शरीर झाकण्याचा प्रयत्न केला नाही.

एका मीडिया कर्मचाऱ्याने याची माहिती दिली महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी राहुल तहिल्यानी यांना दिली. याबाबद्दलची माहिती राहुल यांनी डीसीडब्लू अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना दिली. डीसीडब्लू अध्यक्षांच्या आदेशावरून आयोगाची एक टीम घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी त्या महिलेला आधी कपडे घातले. त्या महिलेजवळ एक स्कूल बॅग होती, त्यामध्ये काही पुस्तकं आणि तिचं आधार कार्ड होतं. आधारकार्डवर असणाऱ्या ऍड्रेसनुसार ही महिला कंझावाला भागातील रहिवासी असल्याचं समजलं. डीसीडब्लूची एक टीम तिच्या घरी पोहचली असता समजलं की, तिची दोन मुलं तिच्या जावेकडे राहत होते.

महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर तिचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ती घर सोडून निघून गेली होती. तिला दोन मुलं असून त्यांना तिची जाऊ सांभाळते. महिलेची जबाबदारी घेण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला. त्यानंतर टीम त्या महिलेला घेऊन मनोरुग्ण हॉस्पिटल IHBAS मध्ये पोहचली, पण हॉस्पिटलने कोर्टाचा आदेश आणण्यास सांगितले. कोर्टाचा आदेश घेऊन त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल म्हणाल्या, जेव्हा लोक एखाद्या मनोरुग्णाशी असं वागतात तेव्हा दुःख होतं. दिल्लीचं हृदय असणाऱ्या राष्ट्रपती भवन भागात ती महिला नग्नावस्थेत फिरत होती. त्या म्हणाल्या, ती महिला आता सुरक्षित आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.