थेऊर : डेंगूने डोके वर काढले, आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकापैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथे डेंगूने डोके वर काढले असून या रोगाचे अनेक संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. याच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायतने युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण या रोगाने अनेक नागरिकांना याची लागण झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या रोगाची लक्षणे आढल्यानंतरही येथील खाजगी सेवा पुरविणाऱ्या डाॅक्टरांनी आरोग्य विभागाला याची कल्पना देणे आवश्यक असताना देखील यासंदर्भात कोणतीही संपर्क केला नाही.

थेऊर हे पुणे सोलापूर महामार्गावरुन केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे शहरापासून जवळ असल्याने येथे कायम भाविकांची गर्दी असते. यावेळी पावसाने आपला मुक्काम वाढवल्याने जागोजागी पाणी साठले आहे. याचा परिणाम डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी ताप सर्दी खोकला या आजाराने डोक वर काढले. यात रुग्णाच्या पांढऱ्या पेशी कमी होऊ लागल्या. त्यातून अनेकांची डेंगू चाचणी करण्यात आली. यात काहींची चाचणी पाॅझिटीव्ह आल्याने येथे डेंगीची लागण झाल्याचे नक्की झाले. अनेक रुग्ण सरकारी दवाखान्यात इलाज न करता खाजगी डाॅक्टराकडे जातात. त्यामुळे नक्की किती रुग्ण या रोगाने बाधीत आहेत हे कळण्यासाठी अडचण येते.

यावर आरोग्य विभागाने दिवाळीच्या काळात संपूर्ण गावात तपासणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी डेंगू उत्पत्ती करणारे डासांच्या अळ्या आढळून आल्या. या पथकाने सर्व पाण्याचे भरलेले ड्रम मोकळे केले. तसेच नागरिकांना स्वच्छता व डेंगू संदर्भात माहिती देऊन जनजागृती केली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण परिसरात फाॅगींग करण्याचे काम चालू आहे

आरोग्य विभागाचे पथक गेल्या रविवार पासून गावात तपासणी करत असून जवळपास सर्वच ठिकाणी डेंगीच्या आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने युध्दपातळीवर यावर प्रतिबंध करण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी अशा लारवा आढळतील त्यांना सक्त ताकीद देऊन दंडात्मक कारवाई झाली तरच नागरिकांना याचे गांभीर्य कळेल असे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे.

गावात एक कोरडा दिवस पाळला जावा अशी सूचना करण्यात आली असली तरीही त्याची अंमलबजावणी नाही तसेच कोरड्या दिवसाची आवश्यकता का आहे तो कसा अमलात आणायचा याची कल्पना ग्रामस्थांना देणे आवश्यक आहे. ही परिस्थिती आवाक्यात आहे तोपर्यंत योग्य पावले उचलली जावीत.

Visit : policenama.com