…म्हणून शिवसेनेसोबत ‘युती’ केली, फडणवीसांनी ‘पहिल्यांदा’च केला मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने झाले. निवडणुकीनंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. याच घडामोडीतून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा उचलणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले तसेच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागत आहे. निवडणूकीला अनेक महिन्यांचा काळ लोटला असला तरी आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या आणि नंतर वेगळे झालेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांच्या वाटचालीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. लोकसभेला युती केली, पण विधानसभेला पुन्हा 2014 च्या धर्तीवर युती केली नाही तर भाजप हा संधीसाधू पक्ष असल्याची टीका होण्याची शक्यता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असा स्वार्थीपणा करू नका, असा सल्ला दिला होता. यामुळेच आम्ही युती केली, असा खुलासा त्यांनी एका वृत्तपत्राच्या वेबसंवाद कार्यक्रमात केला.

जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही
2019 च्या निवडणूक निकालानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद स्विकाराव लागले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने मला पुन्हा सत्तेत आणले होते. पण राजकीय वजाबाकीने घरी बसविले व विरोधी पक्षनेतेपद स्विकारावे लागले. जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही. योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच.

शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली
निवडणूक निकालानंतर झालेल्या घडामोडीबाबत बोलताना फडणवीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत आधीपासूनच काही पडद्याआडून समझोता झाला असावा. नंतर शरद पवार व संजय राऊत यांच्या विधानावरून ते स्पष्टच झाले. लोकसभा निवडणुकीचा निकालाचा कल लक्षात घेत भाजपचे 120-125 तर शिवसेनेचे 90 उमेदवार निवडून येतील असा अंदाज होता. काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट झाले असते. पण भाजपचे जास्त उमेदवार निवडून आल्यास अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करतील, अशी भीती शिवसेनेला दाखविण्यात आली. शिवसेनेने पद्धतशीरपणे राष्ट्रवादी आघाडीला मदत केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.