अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीसांसह भाजप आक्रमक, केला ‘क्लीन चिट’ला कडाडून विरोध

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली परंतु यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. यासंबंधित पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून यात त्यांनी एसीबीने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की एसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांनीच सर्व घोटाळा केल्याचे सांगितले आहे, परंतु सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रांवर तत्कालीन मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असे असताना एसीबीने आज न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की एसीबीने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र चूकीचे आणि दिक्षाभूल करणारे आहे. एसीबीने दाखल केलेले शपथपत्र न्यायालयात स्वीकारले जाणार नाही. मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या असताना देखील अधिकाऱ्यांवर या प्रतिज्ञापत्रातून खापर फोडले जात आहे.

27 तारखेला दाखल केलेले शपथपत्र आणि आज दाखल केलेले प्रतिज्ञापत्र त्रोटक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काही गोष्टीत जाणीवपूर्वक बदल करुन मंत्र्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकण्याचा हा प्रयत्न आहे. गरज पडल्यास या घोटाळ्या प्रकरणी आपण देखील न्यायालयात जाऊ असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/