आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये ; चंद्रकांत पाटलांचा महाडिकांना ‘दम’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरचे राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. तेथील उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी सज्जड दम दिला आहे. धनंजय महाडिकांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये, असा दम चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून आमची युती घट्ट झाल्याने, कोणी पंगा घेऊ नये. मी ओबडधोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही असे समजू नका. जाड भिंगाच्या काचांमधून माझ्या डोळ्यात काय आणि डोक्यात काय चालले, याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

कोल्हापूरात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने धनंजय महाडिकांना मदत करतील, असा संभ्रम कोल्हापूरात झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी आक्रमक होत महाडिकांना दम दिला.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटलांचे वैर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी सतेज पाटलांनी धनंजय महाडिकांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही रंगतदार होणार आहे.