धनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई काळजी घे’

0
233
dhananjay munde
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटवर धनंजय मुंडे यांनी सांत्वन केलंय. पंकजा मुंडे यांना सर्दी झाली असून ताप आलाय. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट केलंय. यावर ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते आणि कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीसाठी भावनिक पोस्ट लिहिलीय. ’ताई काळजी घे’, असे म्हणत त्यांनी बहिणीला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की,’पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की, आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी क्रमांकाचे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी, खोकला आणि ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झालेय..अर्थाचे अनर्थ करणार्‍याकडे दुर्लक्ष करावे. तसेच बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी..’. या ट्विटला रिट्विट करत मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,’पंकजाताई मी स्वतः कोरोनाचा त्रास सहन केलाय, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.’

जून महिन्यामध्ये धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केलीय. करोना आजारात होणारा त्रास धनंजय मुंडे यांनी अनुभवलाय. त्यातूनच त्यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिलाय.