मिसेस सुजय विखे-पाटील यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या सुजय विखे-पाटील प्रचारात मग्न आहेत. अहमदनगर मतदार संघातून उमेदवार भरण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. अशातच धनश्री सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सर्वानीच भुवया उंचावल्या आहेत.

कोणताही गाजावाजा न करता त्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे धनश्री विखे यांनी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी १० मिनिटे आधी येऊन हा अर्ज भरला. तसेच सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जास अडचण आल्यास पर्याय म्हणून धनश्री विखेंनी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सध्या धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक आणि सूचक आहेत. अहमदनगरमधून भाजपाकडून डॉ सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना आता त्यांच्या पत्नीने देखील लोकसभेतही अर्ज दाखल केला असला तरी हा अर्ज म्हणजे ‘डमी अर्ज’ असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजप पक्षात जेव्हा सुजय विखे पाटील यांनी प्रवेश केला त्यावेळी त्या सोहळ्याला पत्नी धनश्री यांनी देखील उपस्थिती लावली होती. सुजय यांच्या प्रत्येक निर्णयामागे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी दिली होती. निर्णय प्रक्रियेतही मी त्यांच्यासोबत आणि सहमत होते. मला कधी त्यांना राजकीय सल्ला देण्याची गरज पडली नाही. पण प्रत्येक निर्णय आम्ही चर्चा करुन घेत असतो.माझ्यापेक्षा त्यांना आई-वडिलांचा सल्ला अधिक मोलाचा आहे. घरात फार राजकीय चर्चा करणं टाळतो. सुजय यांच्या प्रचारात मी काम करणार आहे असं देखील त्या म्हणालया होत्या.